माझी अडाणी आय !
माझी अडाणी आय
तिला क्रांती कळत नाय
ती म्हणाली क्रांती काय र लेका ?
मी म्हणालो आय तुझ्या बोराचा ठेचा
मसाल्याचा कूट अन मिरचीचं वाटण
ज्वारी , बाजरीच पीठ अन गव्हाचं दळण
सुपातलं धान अन ठेकूल निवळण !
माझी अडाणी आय
तिला क्रांती कळत नाय
ती म्हणाली क्रांती काय र बाळा ?
मी म्हणालो माय तुझ्या पदराचा खोचा
तूझं धुण्याच धोपाटण अन पीटन
आदळण अन आपटन, मारणं अन चोपण
चुकलेल्याला शिक्षा अन ज्ञानाची दीक्षा !
माझी अडाणी आय
तिला क्रांती कळत नाय
ती म्हणाली क्रांती काय र मुला ?
मी म्हणालो माय तुझ्या पाळण्याचा झुला
तुझ्या हाथाची दोरी , भुकेची शिदोरी
जस सावित्री च ज्ञान , तशी रमाईची सेवा
जसा अहिल्याचा धर्म तस झलकारीची ललकारी !
#जनसेनानी #Jansenani कल्याण
No comments:
Post a Comment